बाप्पा,
निघालास का?
पण जाता–जाता एक विनंती… आम्हाला माफ करशील का?
का विचारतोयस का? कारण सरळ आहे—
आम्ही तुला P.O.P मधून बनवतो, प्लॅस्टिकच्या सजावटीत राजा बनवतो,
आणि विसर्जनाच्या दिवशी मात्र पाण्यात टाकून सोडून देतो…
ते पण “जरा दूर टाकू, कुणी बघणार नाही” या भावनेने—
जसं कुणी जुना कचरा फेकतो तसं.
पाच–दहा दिवस आम्हाला तू “राजा”,
आणि त्याच्याच दुसऱ्या दिवशी,
कचऱ्यासारखा तुला रस्त्याच्या कडेला, झाडाखाली,
किंवा नाल्यात सोडून देतो.
हिच का श्रद्धा, जी आम्ही रोज गातो अभिमानाने?
खरी गोष्ट तर हीच आहे ना, बाप्पा—
तू P.O.P चा नाहीस, तू मातीचाही नाहीस,
तू मूर्ती नाहीस…
तू बुद्धीचा देवता
तू तर आमचा विश्वास आहेस, आमचं धैर्य आहेस,
आमच्या श्रद्धेचा जीव आहेस.
पण बाप्पा, एक गोष्ट मात्र खरी
शाडू मातीची मूर्ती ही निसर्गाशी एकरूप होणारी,
पर्यावरणाशी मैत्री करणारी आहे.
ती पाण्यात विरघळते जशी आमची चिंता विरघळावी तशी.
तिच्यातून धडा मिळतो की श्रद्धा ही
“पर्यावरणावर ओझं” न होता
“पर्यावरणात मिसळणारी प्रार्थना” असावी.✨
माफ कर बाप्पा—
कारण आम्ही अजून शिकतो आहोत.
शिकतोय की श्रद्धा ही केवळ दिवस साजरे केल्याने नसते,
ती तर रोजच्या जगण्यात असावी.
शिकतोय की विसर्जन म्हणजे श्रद्धेचा शेवट नाही,
तर पर्यावरण रक्षणाचा आरंभ असावा.
एक दिवस नक्की येईल—
जिथे विसर्जनाचा अर्थ “पाण्याला अहित” नव्हे,
तर “निसर्गाला आराधना” असेल.
तो दिवस येईलच, बाप्पा.
तोपर्यंत एकच विनंती-
आम्हाला समजव, शिकव,
आणि आमच्या श्रद्धेचा खरा अर्थ दाखव.